अहमदनगर- जिल्ह्यातील 17 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआईव्ही) पाठवण्यात आले होते. त्यातील 8 व्यक्तींचा अहवाल नकारात्मक आला आहे. मात्र, त्यातील एकाला स्वाईन फ्लू झाल्याचे उघड झाले आहे. तर नऊ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यात सध्या एकच कोरोना बाधित रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना त्यात आता स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेच आहे.
कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला कोणताही त्रास जाणवत नाही. विदेशातून जिल्ह्यात आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण लवकर संपवू शकू, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी महानगरपालिका आयुक्त एस.एन. म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची उपस्थिती होती.
चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन (0241-2431018) करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षचीही स्थापना करण्यात आली असून 1077 हा त्याचा टोल फ्री क्रमांक आहे.