अहमदनगर - नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील दररोज आढळणारा बाधितांचा आकडा तीनशेच्यावर गेला असल्याने प्रशासन काळजीत पडले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपाययोजनांची कडक अंमलबाजवणी केली जाणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता सोमवारी जिल्हास्तरीय समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपा आयुक्त, मनपा वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव हा लग्न समारंभ आणि हॉटेल्समधील गर्दी यामुळे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे येत्या 14 मार्चपर्यंत लग्नस्थळी पोलीस उपस्थित राहून व्हिडीओ शूटिंग घेणार आहेत. पन्नास पेक्षा अधिक लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नियम मोडल्यास गुन्हे दाखल करून मोठा दंड आकारला जाणार आहे.
हॉटेल्सवर टाकणार छापे -
नगर शहर आणि तालुक्यांच्या शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरन्ट पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस छापे टाकून दंड आकारणार आहेत. नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, अन्यथा पोलीस-प्रशासन कडक कारवाई करेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शाळांबाबत येत्या तीन दिवसांत निर्णय -
जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवण्याबाबत येत्या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शाळांतील कोरोना परिस्थितीची माहिती घेऊन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय घोषित होईल.