शिर्डी(अहमदनगर)- संगमनेर शहर आणि तालुक्यातील 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे..संगमनेर येथील 59 वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील 4 जण असे 5 कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली आहे.
गुरूवारी धांदरफळ येथील एका वृध्दाचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून धांदरफळ येथील 4 कोरोनाबाधित व्यक्ती या मृत व्यक्तीच्या नात्यातील आहेत. संगमनेर येथील महिलेला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिचा घशातील स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर तालुक्यात 5 कोरोनाबाधित मिळून आल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. संगमनेर शहरातील इस्लामपूरा, कुरणरोड, बीलालनगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच तालुक्यातील कुरण, धांदरफळ बुद्रुक हे क्षेत्र हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदू पासून जवळपास 2 किमीचा परिसर हा कोरोना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू इत्यादी 9 मे ते 22 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. येण्या-जाण्यास नागरिकांना आणि वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.