अहमदनगर - महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागणी झाली. मात्र, उपचार मिळवण्यासाठी या महिलेची सहा तास फरपट झाली. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका तीनचाकी टेम्पोमधून या कोरोनाबाधित महिलेला घेऊन नातेवाईकांना अनेक रुग्णालयांमध्ये फिरावे लागले.
संबधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच नातेवाईकांनी तिला शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, तिला तेथे दाखल करून घेण्यात आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णाच्या एका महिला नातेवाईकाला पीपीई किट देण्याचे अजब सौजन्य शासकीय रुग्णालयाने दाखवले. त्यानंतर नातेवाईक अनेक रुग्णालयांमध्ये गेले. मात्र, कोरोनाबाधित महिलेला कोणीही दाखल करून घेतले नाही. अखेर नगरसेवक कुमार वाकळे यांनी आमदार संग्राम जगताप यांना ही बाब सांगितल्यानंतर सायंकाळी या महिला रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले.
महानगरपालिकेच्या डॉ. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये ही महिला कर्मचारी आहे. असे असतानाही उपचारासाठी ससेहोलपट करावी लागली. या प्रकारामुळे कामगार युनियनने संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास येत्या सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या कामबंद आंदोलनास आयुक्तच जबाबदार असतील, असेही कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले.