अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात कंटेनर उलटल्याने तब्बल चार ते पाच तास वाहतूक खोळंबली होती. यामुळे, पुणे, औरंगाबाद आणि नगरकडे जाणाऱया प्रवाशांचे मोठे हाल झाले. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नगरहून रांजणगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या कंटेनेरची ट्रॉली जातेगाव घाटात एका उतारावर उलटली. यामुळे ट्रॉलीवर ठेवलेले दोन कंटेनर रस्त्यावर पडले.
या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेन बोलावून रस्त्यावर उलटलेले कंटेनर बाजूला करण्यात आले. दरम्यान खोळंबलेली वाहतूक राळेगणसिद्धी मार्गे वळवण्यात आली होती.
या मार्गावर वाहनांची संख्या मोठी असल्याने चार ते पाच तास वाहने जागेवर उभी होती. कंटेनर हलवल्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. अपघातग्रस्त कंटेनरचा (RJ ०१ GA ७९७७) चालक या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.