अहमदनगर - काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात न्याय योजना मांडली होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ती योजना अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेस आजही आग्रही असल्याचा विचार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
अहमदनगरमध्ये कोरोना आणि निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना थोरातांनी आपले मत व्यक्त केले.
थोरात पुढे म्हणाले, कोरोनाच्या संकटाने सर्व जग व्यापले आहे. त्यातून आपला देश आणि राज्यही सुटले नाही, अशा परिस्थितीत सध्या देशातील व्यवसाय-उद्योग पुन्हा सुरू होत आहेत. मात्र, सामान्य लोकांच्या खिशात पैसे नसतील तर मालाला उठाव मिळणार कसा? त्यासाठी काँग्रेस पक्षाने मांडलेली 'न्याय' योजना ही आता देशासाठी गरज असून देश पातळीवर तिची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, या योजनेच्या माध्यमातून देशातील अर्थचक्र फिरेल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.