अहमदनगर - राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पीक नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहेच मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन सर्वतोपरी मदत करणारच आहे. शेतकऱ्यांनी विमा भरलेला असेल तर त्यांना त्याप्रमाणे मदत दिली जाईल. तसेच जर विमा उतरवलेला नसेल तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत त्या शेतकऱयांना मदत दिली जाईल असे दिवसे यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टरवर शेतातील पीके जमीनदोस्त झाली असून जिल्हा प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. संगमनेर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मका, डाळिंब, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी राज्याचे कृषी आयुक्त सुहास आले होते. यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी, बोरबन, बोटा येथील पिकांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पाण्यात भिजलेली बाजरी, कांदा, ज्वारी, मका पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्याच्या समोर मांडल्या. तसेच शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत विमा योजनेचा लाभ मिळण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले. यावेळी पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसून आले.
हेही वाचा - रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता शोधण्यासाठी 'आप'चे स्पायडरमॅन आंदोलन
शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिवसे म्हणाले, पावसाचे काही खरे नाही, तो कधीही पडत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी कांदा पिकाचाही विमा काढणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून शेतकऱयांना नुकसान भरपाईचे चांगले पैसे मिळतात. दरम्यान त्यांनी डाळिंब बागांचीही पाहणी केली. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत पुणे विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, खंदरमाळवाडी गावचे उपसरपंच प्रमोद लेंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके आदि उपस्थित होते.
हेही वाचा - शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - विजय वडेट्टीवार