अहमदनगर (शिर्डी): राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप आणि बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिवराव लोखंडे, आदी उपस्थित होते.
पशुपालन शेतीस पुरक व्यवसाय: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 'पशुधन हिताय, बहुजन सुखात ब्रीद' जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. शासनाने लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी निधी दिला. राज्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत 'लम्पी' आजाराची लसनिर्मिती केली जाईल. याचा पहिला बहुमान महाराष्ट्राला मिळेल. पशुपालन हा शेतीला पुरक व्यवसाय आहे. याला चालना मिळावी याकरिता नवीन प्रजातींची माहिती पशुपालकांना दिली जाईल.
दुष्काळी जिल्ह्यांना मदत: 'महापशुधन एक्स्पो'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने शेती आणि पशुपालन करण्याचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे 'महापशुधन एक्स्पो' शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेत केंद्र आणि राज्य शासन मिळून १२ हजार रुपयांची आणि दुष्काळी जिल्ह्यात २१ हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहे. शासनाकडून शेळी-मेंढी विकास महामंडळाकरिता १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी एस.टी. बसमध्ये ५० टक्के तिकिट सवलत, मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवत आहे. हे सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधणारे सरकार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
दूध भेसळ न करण्याचे आवाहन: पशुसंवर्धनमंत्री विखे-पाटील म्हणाले की, तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनात आतापर्यंत ८ लाख लोकांनी भेट दिली आहे. राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत दूध उत्पादक व्यावसायिकांना सर्वाधिक दर देण्याचे धोरण ठरविले आहे. मात्र दूध भेसळ करू नका असे. आवाहन देखील पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले.