अहमदनगर - नगर-मनमाड राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्याने रस्त्याला चाळणीचे स्वरूप आले आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या वतीने तरुणांनी राहुरी फॅक्टरी येथे स्वतःला खड्ड्यात बुजवून घेत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधून निषेध नोंदविला.
प्रशासनाकडून दुर्लक्ष-
अहमदनगर मनमाड या मार्गाची दुरवस्था झालेली आहे. गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लढा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मार्च महिन्यात काम चालु होणार होते. मात्र त्या कामाला काही मुहूर्त सापडला नाही. नगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. यामुळे महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात झाले, तर अनेक वाहन चालकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावरील ग्रामस्थांनी एक रस्ता दुरुस्ती कृती दल स्थापन करून वारंवार प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी निवेदने दिली. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नाही तर आत्मदहन करू-
या रस्ता दुरुस्तीसाठी कृती समितीने आंदोलन हाती घेतल्यानंतर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले, मात्र या कामासाठी माती मिश्रीत खडीचा वापर केला गेला आणि एका दिवसात खड्डे जै थे झाले आहेत. त्यामुळे या आंदोलकांनी थेट स्वत: खड्ड्यात बसून आंदोलन केले आहे. तसेच आता या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तर मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा यापुढे खड्ड्यात बसून आत्मदहन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.