अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या दर्शानासाठी दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकासांठी मध्य रेल्वेने खूषखबर दिली आहे. आजपासून सिकंदराबाद ते शिर्डी ही द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साईनगर रेल्वे स्थानकातच्या स्टेशन मास्टर एल.पी. सिंग दिली. या गाडीतून 150 भाविक साईबाबांच्या दर्शानासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या मध्य रेल्वेकडून हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. आजपासून शिर्डीला जोडणाऱ्या तीन गाड्या सुरू करण्यात आल्या. दक्षिण भारतातील भाविकांचा शिर्डीकडील ओघ लक्षात घेता द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस शिर्डी-सिकंदराबाद-शिर्डी व काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केल्या आहेत.
सिकंदराबाद ते साईनगर शिर्डी ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी आजपासून सुरू करण्यात आली. ही गाडी हैदराबादच्या सिकंदराबादहून दर शुक्रवार, रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसूल मार्गे शिर्डीला सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. शिर्डी-सिकंदराबाद ही विशेष गाडी शिर्डीहून दर शनिवारी व सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबादला सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल. तसेच काकिनाडा- शिर्डी ही विशेष रेल्वे काकिनाडाहून दर सोमवारी बुधवार, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल. राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे शिर्डीला सकाळी ०९.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात शिर्डी-काकिनाडा ही विशेष गाडी शिर्डीहून दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वा. पोहोचणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन आरोग्य विभागाकड़ून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आज द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस सिकंदराबाद-शिर्डी ही गाडी नगरमध्ये आली. यानंतर संपूर्ण रेल्वे सॅनिटाइझ करण्यात आली. तसेच परतीच्या प्रवासाचे तिकीट असलेल्या प्रवाशांना स्टेशनमध्ये चेक करून सोडण्यात येत आहे.