अहमदनगर - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अकोले तालुक्यातील अभिनव शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी व पालक यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गौरवगीत आपापल्या घरी गात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अभिवादन केले. 1 मे हा राज्यभर महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. तसाच तो अभिनव शिक्षण संस्थेतदेखील साजरा होतो. परंतु यावर्षी कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातले.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातदेखील लॉकडाऊन असल्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी अभिनव शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचारी, विद्यार्थी व पालक सुमारे 3000 विद्यार्थी 350 शिक्षक यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गौरवगीत गाण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत पालक आणि विद्यार्थ्यांनी घरी राहून महाराष्ट्र दिन साजरा केला.