शिर्डी - नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो कार्यालयाकडून शिर्डी विमानतळास प्रवासी वाहतुकीसोबत कार्गो वाहतुकीसाठीदेखील मान्यता मिळाली असून लवकरच शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक मालास व वाहतुकीस चालना मिळणार असल्याची माहिती "ईटीव्ही भारत"शी बोलताना शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.
काम प्रगतीपथावर
भारतातील विविध शहरांमध्ये उड्डाणांद्वारे वाहतूक करण्यास मदत होईल. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हवाई वाहतुकीमुळे वेळेची बचत होईल. लवकरच या मर्यादित मालवाहतूक सेवेस शिर्डी विमानतळ सुरूवात करेल आणि त्यासाठी काही आवश्यक उपकरणे बसविण्याचे काम शिर्डी विमानतळ करत असून काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती शास्त्री यांनी दिली आहे.
प्रतिसादानंतर पुढील निर्णय
शिर्डी विमानतळ प्रशासनाने कार्गो वाहतुकीसाठी नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोकडे परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीचे पत्र नुकतेच शिर्डी विमानतळ प्रशासनास मिळाले आहे. सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांमधूनच मालवाहतूक होणार आहे. यास कसा प्रतिसाद मिळतो यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मालवाहतूक सुरू झाल्यावर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून शिर्डीसह परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची होती मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी होती, की शिर्डी विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी आणि आजआखेर कार्गो वाहतुकीस परवानगी मिळाली असल्याने शेतकऱ्यांनासह इतरही व्यवसायिकांनी आनंद व्यक्त करत शिर्डी विमानतळ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.