अहमदनगर - विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जाणाऱ्या शिर्डी साईबाबा संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या बसचा शिर्डीत अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने मनमाड महामार्गावर स्कूल बसला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने बसमधून घरी परतणारे सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत.
शिर्डी साईबाबा संस्थेच्या श्री साईबाबा इंग्रजी माध्यम शाळेत पंचक्रोशीतून मुले शिकण्यासाठी येतात.या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे बस जात असताना भरधाव वेगातील स्विफ्टने पाठीमागून बसला जोराची धडक दिली. हा अपघात शाळेपासून काही अंतरावरील नगर- मनमाड महामार्गावरील रत्नाकर बँकेजवळ झाला. या धडकेचा मोठा आवाज झाल्याने बसमधील विद्यार्थी तसेच रस्त्यावरील नागरिकही घाबरून गेले होते.
साई संस्थानच्या वाहन विभागाला अपघात झाल्याची माहिती मिळताच तातडीने शाळेची दुसरी बस घटनास्थळी पाठविली. बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. या अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहनांतील कोणीही जखमी नझाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.