अहमदनगर - संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने एक महिला आणि चार वर्षांची मुलगी जागीच ठार झाले. गिताली दिलीप दरंदले (वय-३२) आणि शमीका जितेंद्र जगदाळे ( वय- ४ ) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. कासारवाडी शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
पुणे येथून गिताली दिलीप दरंदले, प्रिन्सेस दिलीप दरंदले, शमीका जितेंद्र जगदाळे, संगीता दिलीप सोनवणे (रा. बुरुडगाव, अ.नगर), दिपाली जगदाळे (रा. वाघोली, पुणे), इशीका मनोज भेकरे (रा.खराडी, पुणे) हे सर्व जण कारने संगमनेर बायपास मार्गे नाशिकला देवदर्शनासाठी जात होते. गिताली दिलीप दरंदले (वय-३२) या कार चालवत होत्या. कार कासारवाडी शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावर आल्यानंतर कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात गिताली दिलीप दरंदले आणि शमीका जितेंद्र जगदाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - 24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज
या घटनेची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारचे पत्रे आणि दरवाजे तोडून आतील मृतांना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेले प्रिन्सेस दिलीप दरंदले (वय-११), संगीता दिलीप सोनवणे (वय-५०), दिपाली दिलीप जगदाळे (वय-३१), इशीका मनोज भेकरे (वय-५) यांना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी रस्त्यात आडवी झालेली कार हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची माहिती समजताच मृतांच्या नातेवाईक संगमनेरमध्ये दाखल झाले. या कारमध्ये सर्वच महिला होत्या.