अहमदनगर - शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषद व्हावी ( Demand for Municipal Council ) यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणूकीवर बहिष्कार ( Boycott on Nagar Panchayat Elections ) टाकत उमेदवारी अर्ज कोणीही भरणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र गेल्या सात दिवसांपासून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. मात्र आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल ( Two Independent Candidates Filed Nominations ) केल्याने एकजुटिला छेद गेल्याचे दिसून आले आहे. शिर्डीतील अनिता सुरेश आरणे ( Anita Suresh Arne Shirdi ) यांनी सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 1 मधून अर्ज दाखल केला आहे. तर त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश काळू आरणे ( Former Corporator Suresh Kalu Arne ) यांनी अनुसूचित जाती वार्ड क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी निवडणूकीवर टाकलेला बहिष्काराचा प्रयन्त निष्पळ ठरला.
- काय आहे प्रकरण?
सुरेश आरणे हे काँग्रेसचे शिर्डी शहर उपाध्यक्ष असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहराच्या एकजूटीला छेद गेला असून आता आणखी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संविधानाने मिळालेल्या आधिकाराचा वापर करत मी उमेदवारी अर्ज दाखल केला असून संभाव्य दबावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे पोलीस संरक्षणाची मागणीही अपक्ष उमेदवार सुरेश आरणे यांनी केली असल्याचे सांगितले आहे. शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद व्हावी, यासाठी शिर्डीतील शिवाजी गोंदकर यांनी गेल्या 2016 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल 2018 लागला होता त्यावेळी उच्च न्यायालयाने शिर्डी नगरपंचायतची नगर परिषद करण्याचा निर्णय दिला होता. मात्र गेल्या 4 वर्षाचा कालावधी लोटूनही शासनाने नगरपरिषद केली नव्हती. शिर्डी नगरपंचायतची निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिन्या आधीच वरील याचिकेवर शिवाजी गोंदकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकेवर आज (7 डिसेंबर) रोजी सुनावणी होणार आहे.
शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषद होणारच असल्याने पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याने आणि शासनाने नगर परिषद जाहीर करावी, ही मागणी करत शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. या दरम्यान कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील सर्व पक्षीय शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर 2 डिसेंबरला शिर्डी नगरपंचायतची नगर परिषद करण्याची आधिसूचना काढली होती. त्या आधीच निवडणूकीवर बहिष्कार टाकलेल्या ग्रामस्थांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी प्रयत्न केले.