अहमदनगर - कोविड लसीकरणासाठी विकसीत करण्यात आलेल्या अॅपमधील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. यातील एक प्रमुख त्रुटी म्हणजे लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर आपले गाव, तालुका सोडून कधी दुसऱ्या तालुक्यात तर कधी थेट दुसऱ्या जिल्ह्यात लसीकरणाची सोय देण्यात येत आहे. यातून अनेक वेळा संघर्ष निर्माण होत आहे. आमच्या केंंद्रावर इतर नागरिकांना लस घेऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक नागरिक घेताना दिसत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील प्रकार
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहरातील हा प्रकार असून, इथे स्थानिकांपेक्षा इतर तालुक्यातील नागरिकच लस घेत असल्याचे समोर येत आहे. याला स्थानिकांनी विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, अमोल गर्जे यांनी याविषयी आवाज उठवला आहे. पाथर्डी हा दुष्काळी आणि ऊसतोडणी कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क नसते, लोक अडाणी आहेत, अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत त्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनेकांना शक्य होत नसून, आमच्या तालुक्याच्या वाट्याला आलेल्या लसी इतर तालुका आणि जिह्यातील नागरिक घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बीड, पुणे, मुबंई येथील नागरिक पाथर्डी तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर येत असून, या बाहेरच्या लोकांना पाथर्डी तालुक्यात का रजिस्ट्रेशन करून लस दिली जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यापुढे फक्त पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनाच लस द्यावी, बाहेरच्या व्यक्ती आल्यास त्यांना आम्ही परत पाठवू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा - लग्नातील फोटो देण्याच्या बहाण्याने केली मैत्री, ठेवले शारीरिक संबंध, पोलिस तक्रार दाखल