शिर्डी (अहमदनगर) - साईमंदिर खुल व्हावे म्हणून ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी भारतील जनता युवा मोर्चाच्या वतीने शिर्डीत श्रीसाई मंदिराला साकडं फेरी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी दिली.
शिर्डीसह पंचक्रोशीतील अर्थकारण पूर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार-प्रसाद विक्रेते, ट्रॅव्हल्स एजन्सी व त्यांवर अवलंबून असलेले सर्वजण, फुल उत्पादक शेतकरी यांच्यासह हातावर उपजिविका असणारे लोकांचे आर्थिक संकटामुळे हाल होत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हफ्ते थकल्याने अनेकांना बँका, फायनान्स कंपन्या व सावकारांच्या तगाद्यांनी हैराण केले आहे. ठप्प झालेले अर्थकारण पूर्वपदावर यावे तसेच देशासह जगभरातील साईभक्तांच्या भावनेचा व श्रद्धेचा विचार करता साईमंदिर भाविकांसाठी खुले होणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे भाजयुमोच्या वतीने शासनस्तरावर निवेदन देवून मंदिर खुले करण्याबाबत मागणी केली होती.
शासनाने लसीचे दोन डोस घेतलेल्यांना व कोरोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांना मुभा दर्शनासाठी द्यावी
ठाकरे सरकारला या संदर्भात जाग आली नाही. वास्तविक यापूर्वी साईमंदिर खुले असताना साईबाबांच्या आशिर्वादाने एकाही साईभक्ताला किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. राज्यात बार, दारुची दुकाने त्याचबरोबर राजकीय कार्यक्रम व इतर आस्थापना सुरळीत सुरू आहे. तसेच देशांतर्गत इतर राज्यातील धार्मिक तिर्थस्थळे उघडी असतांना महाराष्ट्रातील देवस्थाने बंद का, साईमंदिर बंद का, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला आहे. साईमंदिराकडे आरोग्य विषयक कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेणारी परिपूर्ण वैद्यकीय यंत्रणा असताना साईमंदिर दर्शनासाठी बंद ठेवणे चुकीचे आहे. शासनाने लसीचे दोन डोस घेतलेल्या तसेच कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असलेल्या साईभक्तांना ऑनलाइन पद्धतीने नियम व अटींनुसार दर्शन देणे गरजेचे आहे, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.
साई दर्शनासाठी आतूर झालेल्या भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा व अर्थकारणाचा रुतलेला शिर्डीसह पंचक्रोशीचा गाडा सुरळीत व्हावा यासाठी आम्ही ठाकरे सरकारला जाग यावी म्हणून गुरुवारी (12 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता साईमंदिराला प्रदक्षिणा घालून साकडं फेरी आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही ठाकरे सरकारला जाग आली नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सचिन तांबे यांनी दिला आहे.
हेही वाचा - पेटा हटाव बैल बचाव: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन