अहमदनगर : काँग्रेसचे पहिल्यापासून दुर्दैव आहे की प्रत्येक प्रस्थापित आणि मोठा नेता आपली खुर्ची सांभाळण्यात व्यग्र आहे. यातून इतर काँग्रेस आमदार, नेते कार्यकर्ते यांची कामे खुद्द पक्षाच्याच मंत्र्यांनी केली नाहीत, याचा मोठा असंतोष पक्षात आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप होईल असे भाकीत भाजपचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे. तसेच काँग्रेस पक्ष आता ज्येष्ठ लोकांचा पक्ष राहिला आहे. राहुल गांधी हे एकमेव युवा पक्षात आहेत असा टोलाही विखे यांनी काँग्रेसला लगावला आहे.
काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप : अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना खासदार सुजय विखे यांना सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवरून छेडले असता, त्यांनी तांबे यांचा उल्लेख टाळून काँग्रेस पक्षात मोठा असंतोष असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये ठराविक प्रस्तावित मंत्री, नेते हे इतर आमदार, नेत्यांची कामे करत नाहीत. असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमधल्या ज्येष्ठ लोकांनी सत्ता भोगूनही काही योगदान दिले नाही. तर नवीन पिढी मात्र त्यांना नाकारून वारंवार दूर करते. या प्रकारामुळे अनेक युवक बाहेर पडले. मी स्वतः बाहेर पडलो, ज्योतिरादित्य शिंदे बाहेर पडले, सचिन पायलट त्या मार्गावर आहेत. अनेक नेत्यांत, आमदारांत नाराजी आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे फुटून बाहेर पडणे हे निमित्तमात्र आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप होईल असे भाकीत विखे यांनी व्यक्त केले.
एकमेव तरुण राहुल गांधी राहतील : आता काँग्रेस पक्षात राहण्यात युवकांना इच्छा राहिली नाही. सर्व युवा नेते बाहेर पडत आहेत तर नवतरुण भाजपकडे आकृष्ट होत आहेत. काँग्रेस पक्ष आता ज्येष्ठ नागरिकांचा पक्ष राहिला आहे. केवळ राहुल गांधी हेच एकमेव तरुण पक्षात असतील असा टोला खा.सुजय विखे यांनी काँग्रेसला यावेळी लगावला.
हेही वाचा : Mahesh Chavans Reaction : भाजपाने राष्ट्रवादीत एकनाथ शिंदे शोधू नयेत - महेश चव्हाण यांची प्रतिक्रिया