अहमदनगर - महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार, असे वक्तव्य अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे शिवसेना याला काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी आणि सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात येणार आहे. त्यानिमित्त आज (बुधवारी) यात्रेच्या नियोजनासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना शिंदे यांनी विधानसभेसाठी युती होणार असली तरी जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यात २०१४ साली सेना-भाजप स्वतंत्र लढले. सध्या भाजपचे १२३ आमदार आहेत तर शिवसेनेचे ६३ आमदार असून सेना ज्या जागा कधीच जिंकली नाही, अशा अनेक ठिकाणी भाजपत नव्याने दाखल झालेल्यांसाठी या जागा सेनेला सोडाव्या लागतील, असे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी राहात्याच्या जागेचे उदाहरण देत ही जागा राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सोडावी लागेल, असे सांगितले.
जिल्ह्यातील अकोले आणि राहाता या जागा सेनेकडे असल्या तरी भाजपत नव्याने दाखल झालेले आमदार वैभव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सद्यस्थितीत असलेली जागा सोडावी लागेल, अशी माहिती शिंदेंनी आज माध्यमांशी बोलताना दिली. त्याच बरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी नगर शहराची जागा ही भाजपकडे यावी, यासाठी मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सोमवारी बोलतील, असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.