अहमदनगर: नृत्यंगना गौतमी पाटील हिच्या नृत्यावर अजित पवार यांनी आक्षेप घेत लोककलेत अश्लीलता नसावी, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर भाष्य करताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिला. एखादा अपवाद वघळता त्यांनी राज्यासाठी खूप कामे केली आहेत. त्यांच्या वयाचा विचार करुन विरोधकांनी त्यांचा आदर करणे अपेक्षित आहे. नवीन राज्यपाल सक्षम आहे तेव्हा जयंत पाटलांनी आपल्या पक्षाध्यक्षांना सांगितले तर राज्यात शांतता राहील, अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांच्यावर विखे पाटील यांनी केली.
भाजपमध्ये आल्यास स्वागतच : बाळासाहेब थोरातांच्या नाराजीची दखल कॉंग्रेस पक्षाने फार काही घेतली नाही. मात्र त्यांच्यासाठी मार्ग खुला आहे. थोरातांनी दिल्या घरी सुखी राहावे. भाजपात आले तरी आपण त्यांचे स्वागतच करू, असे देखील विखे पाटील यांनी यावेळी म्हटले. बऱ्याच दिवसांपासून बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेस पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते भाजपात जाणार अशाही चर्चांना उधान आले असताना विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात भाजपात आले तर स्वागत करू म्हणत एक गुगलीच टाकली आहे.
थोरात यांच्यावर टीकास्त्र: बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भीमगर्जना करत बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे खिंड लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता ते खिंड सोडून पळाले आहेत, अशी खरमरीत टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परवा कराडमध्ये माध्यमांशी बोलताना केली होती.
भाजप विजयाचे श्रेय तांबे यांना: विखे-पाटील म्हणाले, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा भाजपमुळेच विजय झाला आहे. विजयानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यातून सर्व काही स्पष्ट होते. आमदार सत्यजित तांबे यांनी आता भाजपमथ्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भाजप कार्यकत्यांची इच्छा आहे.
अंतर्गत वादाची जबाबदारी घेणार का? नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे कॉंग्रेस पक्षांतर्गत निर्माण झालेल्या वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झाला असल्याचे सांगून विखे-पाटील म्हणाले, पक्षीय वादावर बाळासाहेब थोरातांनी पक्षाध्यक्षाकडे जाऊन भांडावे अथवा राज्याच्या प्रभारीकडे जाऊन भांडावे. परंतु, पक्षांतर्गत वादामुळे महाविकास आघाडीवर झालेल्या परिणामाची जबाबदारी ते घेणार की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.