अहमदनगर - भाजप नेते एकनाथ खडसे आज साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीसह त्यांच्यावर झालेल्या कारवाईशी संबधित काही खुलासे माध्यमांसमोर केले. आपण आत्मचरित्र लिहणार असून त्यामध्ये मी सर्व गोष्टींचा उलघडा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आत्मचरित्रासाठी अजून वेळ लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्या राजकीय जीवनात अनेक नेते माझ्यासोबत आले. काही लोक मला मिळाले, मोठ्या जागेवर बसले, मात्र त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांनाही त्रास होतोय, ते अडचणीत सापडलेत, आता त्यांना वाटत असेल की, नाथाभाऊ बरोबर असते तर वेगळी स्थिती असती. माझ्यावर दाऊदच्या पत्नीशी बोलल्याचा आणि पत्नीच्या नावावर जमिनी घेतल्याचे आरोप केले गेले. त्याच्या सर्व चौकशीला मी सामोरे गेलो, त्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. जाणून बुजून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. सध्या तरी दोन वर्षे माझा आत्मचरित्र लिहिण्याचा विचार नाही. मात्र, त्यानंतर मी नक्की लिहिणार आहे. ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या नावासह त्यात उल्लेख जरुर करेन. मी घेतलेल्या काही निर्णयांचाही त्यात मी उल्लेख करेन, असे खडसे म्हणाले.
हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे - अशोक चव्हाण
त्यांच्या या वक्तव्यामुळे 'ते' अडचणी सापडलेले कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे.
पुढे खडसे म्हणाले, साईबाबांचा मी भक्त आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मी शिर्डीला येतो. एरव्ही लोक जिंकून आल्यानंतर दर्शनाला येतात. मात्र, मी लेकीच्या पराभवानंतरही दर्शनाला आलो आहे. साईबाबांनी दिलेली श्रध्दा आणि सबुरीची शिकवण मी मानत आजपर्यंत पक्षावर श्रध्दा ठेवली आहे. आज बाबांना हेच विचारले की, आणखी किती दिवस श्रध्दा ठेऊ? असेच राहु की, पुढे काय करू? आता हे साई बाबाच मला सांगतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
हेही वाचा - शिवसेनेचा चालेल, पण भाजपचा मुख्यमंत्री नको - हुसेन दलवाई
महाराष्ट्रातील निवडणुका आम्ही युती म्हणून लढलो आहोत. आमच्या पक्षाला जागा कमी मिळाल्या आहेत. मात्र, युतीला बहुमत मिळाले असल्याने, आमचे सरकार स्थापन होईल, हा मला विश्वास आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होईल, तसेच ५०-५० टक्के वाटा हवा, असे बोलत आहेत. त्यांनी तसं ठरल्याचं ते सांगत आहेत. ज्यांच्यामध्ये हे ठरले होते, तेच काय ठरलंय हे सांगू शकतील. मात्र, येत्या ९ तारखेपर्यंत योग्य निर्णय होईल. मात्र भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असेही त्यांनी सांगितले.