अहमदनगर - मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, अशा घोषणा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावी, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शिर्डीमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहेत. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मैदानात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणात साधू भजन-कीर्तनात मग्न आहेत.
भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यात अनेक साधू, धार्मिक व अध्यात्मिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून दुपारी चार वाजेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. राज्यातील प्रमुख देवस्थाने खुली करण्यासाठी भाजपा पुन्हा आक्रमक झाली असून राज्यातील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी साधू लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहे. त्याला भाजपाने पाठिंबा दिला आहे.
तुषार भोसले हे त्र्यंबकेश्वर येथील महंतासोबत साई मंदिर शिर्डी येथे उपोषणासाठी बसले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शिर्डीला येणार आहेत. शिर्डीचे साई मंदिर या आंदोलनाचे मुख्य केंद्र असून मंदिरे उघडण्यासाठी पूर्वी केलेले घंटानाद आंदोलन केवळ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांपुरते मर्यादित होते. यावेळी साधूंना मैदानात उतरवून भाजपाने पाठिंबा द्यायचा, अशी रचना केली आहे.
आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी मंदिरावर अवलंबून असलेले छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही आंदोलनात सहभागी करून घेण्यात आले आहे. देशातील प्रमुख देवस्थानात शिर्डीचा समावेश असल्याने येथील आंदोलनावर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे.