शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या मंदिरासह इतर धार्मिक स्थळी लवकर खुली करावी अन्यथा आता वर्षासमोर टाळ-मृदुंग आंदोलन येईल, असा इशारा माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (29 ऑगस्ट) शिर्डीत घंटानाद आंदोलनावेळी दिला आहे.
राज्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी आज नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शिर्डीतील साईमंदिर उघडण्यासाठीही भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे यांच्या उपस्थित साईमंदिराजवळ जाऊन टाळ वाजवत घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकारने दारुचे दुकाने तसेच मॉल उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास परवानगी सरकार देत नाही. केवळ मंदिरे उघडल्यानेच कोरोनाचा फैलाव अधिक होतो का असा सवालही विखे यांनी उपस्थित केला आहे.
सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. सरकारकडे मागूनही काही मिळत नाही आणि कोरोनाची साथही आटोक्यात येत नाही. त्यामुळे आता आम्हाला देवाकडेच धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करावीत अन्यथा आम्ही आमच्या परीने मंदिर उघडून दर्शन घेऊ, असा इशारा भाजप खासदार सुजय विखे यांनी दिला.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोरोना काळात गर्भवती महिलांचा जीव टांगणीला, पुरेशा खाटा नसल्याने अडचणी