अहमदनगर - राज्यात नाशिक खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर जास्त आहे. वाढत्या कोरोना प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दुचाकीवर विनाकारण डबलसीट वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आजपासून दुचाकीवर फक्त एकाच अर्थात दुचाकी चालवणाऱ्यालाच परवानगी असेल. याबाबतचा आदेश आज शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. यातून केवळ डबलसीट असलेलेल्या म्हणजेच रुग्ण असणाऱ्या दुचाकीस्वारास वगळण्यात आले आहे.
जिल्ह्यात काल (शुक्रवारी) गेल्या चोवीस तासात 3 हजार 953 नवे बाधित रुग्ण आढळून आले. सध्या 23 हजार 241 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1 हजार 993 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या काही दिवसांत सरासरी रोज 40 ते 50 रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागण्यागोदरच नगर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आलेला आहे. मात्र कोरोना रुग्ण घटण्याऐवजी वाढतच असल्याचे शासकीय आकडेवारी वरून दिसत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. काल शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेले लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्याबरोबरच नव्याने कोणते प्रतिबंध वाढवता येतील यावर देखील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना केल्या. कोरोना विषाणूंचा फैलाव वाढत असल्याने आता दुचाकीवर फक्त चालकास परवानगी असेल. दुचाकीवर दोन व्यक्ती आढळल्यास दोघांवर गुन्हे दाखल करून दंड करण्यात यावा, असे आदेश काढले आहेत.