अहमदनगर - कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्हा पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. जिल्हा व तालुक्यातील कोरोना पूर्णपणे रोखण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सातत्याने सूचना केल्या आहेत. आता रुग्णवाढ व त्यावरील उपाय योजनांसाठी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवीन 500 बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अमृत कलामंच येथे बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, डॉ. हर्षल तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, डीवायएसपी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी संदिप कचोरीया, तालुका वैद्यकिय अधिकारी सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घूगरकर, मुख्याधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ हे उपस्थित होते.
या बैठकीत थोरात यांनी कारखान्याला नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नवीन नगर रोडवरील विघ्नहर्ता पॅलेस या ठिकाणी कारखान्याच्या वतीने पुरुषांसाठी स्वतंत्र 300 बेड व महिलांसाठी स्वतंत्र 200 बेडचे असे एकूण 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. थोरात यांनी कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी सातत्याने प्रशासनाला मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयांमध्ये राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशिन दिले आहे. 5 बायपास मशीनही कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. तसेच घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने 40 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत.
तालुक्यातील आपत्तीच्या वेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी सातत्याने मदतीची भूमिका घेतली आहे. मागील वर्षी कोरोना संकटात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. याचबरोबर मोफत अन्नछत्र सुरू केले होते. सध्याचा वाढता कोरना प्रादुर्भाव पाहतात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यास बाळासाहेब थोरात यांनी 500 बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तातडीने नवीन रोडवरील विघ्नहर्ता पॅलेस याठिकाणी कोविड केअर सेंटरसाठी अद्ययावत सुविधा देण्याच्या कामास सुरुवात केली आहे. हे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, '30 एप्रिलपर्यंत सर्वांनी अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाऊन पाळला तर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. तालुका कोरोना मुक्तीकडे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त बाळगणे, प्रशासनानेही कडक शिस्त लावावी'.
कारखान्याच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे कोरोना सेंटर तातडीने सुरू करण्यासाठी कारखान्याच्या वतीने काम युद्ध पातळीवर आहे.