अहमदनगर - सध्याची कोरोना लाट ही मोठी आहे. यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर ,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे ,पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप ,डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जराड ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. कोणत्याही कुटुंबांमध्ये एखाद्या व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याचे होम क्वारंटाईन बंद करून तातडीने संस्थात्मक विलगीकरण करा. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली. तर आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरातील एका व्यक्तीला कोरोणाची लागण झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट विलगीकरण करून तातडीने करा. जेणेकरून इतरांना त्याची बाधा होणार नाही. कोरोणाची रुग्ण संख्या कमी होणे हेच अत्यंत आवश्यक आहे. राज्य पातळीवर आपण सातत्याने काम करत असून जिल्ह्याकरीता व तालुक्यासाठी ऑक्सिजन व रेमडिसीवर औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मार्ग निघत आहे .मात्र वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हेच मोठे आव्हान आहे. ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण संख्या आहे तेथे पोलिस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करा. गावच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जागृततेबरोबर रुग्ण वाढ आपल्या गावात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सातत्याने प्रयत्न -
सध्या कोरोनारुग्ण वाढीमध्ये रुग्णांकरिता ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्याकरता आपण राज्य पातळीवरून प्रयत्न करत आहोत. ही गरज कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कोरोना रुग्ण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या प्रभागात घरोघरची काळजी घ्या, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
घरोघर तपासणीवर भर -
गावातील पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करा कोणताही ताप असेल तर तातडीने त्याचे संस्थात्मक विलगीकरण करून त्याच्यावर उपचार करा म्हणजे आपल्याला कोरोनाची वाढ रोखता येईल अशी सूचना मंत्री थोरात यांनी केली आहे.