संगमनेर- दूध उत्पादक शेतकरी हाच दूध संघाचा पाया आहे. संकट काळात मदत करणे ही तालुक्यातील सहकारी संस्थांची संस्कृती आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आधार मिळावा यासाठी चारा व बियांणांसह, राजहंस दूध संघाने कायम शेतकर्यांना मदत केली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात प्रातिनिधिक स्वरूपात दूध उत्पादक शेतकर्यांना बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते, यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख,बाजीराव खेमनर, जी.एस.शिंदे उपस्थित होते. यावेळी दूध उत्पादक शेतकरी गोरक्ष नवले,संभाजी गुंजाळ, भाऊसाहेब राऊत, बाळासाहेब आगलावे, अर्जुन राऊत यांना ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात चारा बियाणे वाटप करण्यात आले.
दुध व ऊस हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे बाळासाहेब थोरात
यावेळी थोरात म्हणाले की, दुध व ऊस हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. दूध व्यवसायातून ग्रामीण भागात मोठी क्रांती झाली आहे. गोरगरीब कुटुंबियांना या व्यवसायातून मोठा हातभार लागला आहे. राजहंस दूध संघाने कायम आपली सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात शेतकर्यांना व दूध उत्पादकांना मोठी मदत केली आहे. कोरोनाचे संकट व सर्वत्र असतानाही एक दिवस ही बंद न ठेवता या दूध संघाने सातत्याने दूध स्वीकारले आहे. दूध कमी झाले की एक रुपयासाठी अनेक शेतकरी इतर खासगी दूध संघांना दूध पुरवतात आणि त्यांनी ते घेतले नाही की पुन्हा आपल्याकडे येतात. मात्र तरीही या संघाने कायम सर्वांना सामावून घेतले आहे .गुणवत्तेची परंपरा राखत आज राज्यांमध्ये राजहंस दूध संघाचा नावलौकिक झाला आहे. बियाणे व चारा देऊन शेतकरी बांधवांना मोठी मदत केली असल्याचे ही ते म्हणाले.
हेही वाचा-'अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य मागे घेतो; भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी' - बाबा रामदेव