अहमदनगर - आघाडीला वंचितमुळे लोकसभेत ९ जागांना फटका बसला आहे. आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज (२१ जुलै) थोरात यांनी शिर्डीतील साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज ठाकरेंच्या सभा यशस्वी झाल्या. सभांच्या चर्चाही झाल्या. मात्र, ही गर्दी मतात परावर्तित का होवू शकली नाही ? आघाडीसाठी मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल.
राजकारणातील पारंपारिक विरोधक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि खासदार डॉ़. सुजय विखे यांनी विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात झळकले. त्यांच्या या भेटीत आपसात काय चर्चा झाली ? याबाबत दोघांच्याही समर्थकात उत्सुकता होती.
त्याबाबत त्यांना छेडले असता तो केवळ योगायोग होता, व्यक्तीद्वेशाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले आहे.