शिर्डी(अहमदनगर)- संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. मात्र, यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून घरगुती समारंभ व नागरिकांनी गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या कोरोना काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व देणे गरजेचे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना वर मात करण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबवावे, अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कला मंच येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
तालुका व शहरातील कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बाळासाहेब थोरात यांनी घेतली. सहकारी संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर, तालुक्यातील रुग्ण तपासणी व्यवस्था याचा आढावा घेऊन थोरात यांनी घेऊन प्रशासकीय अधिकार्यांना काही सूचना केल्या.
शहरात व तालुक्यात कोरोनाची साखळी संपुष्टात आणण्यासाठी प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र, त्याला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे. आता कोरोना तिसर्या टप्प्यात आला असून तो रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट व गाव निहाय विविध आरोग्य समित्या स्थापन करुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे बाळासाहेब थोरत यांनी म्हटले.
ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करावे. हा संकटाचा काळ आहे, या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. याबाबत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अधिक जागरूक होऊन आपल्या परिसरातील नागरिकांना सद्यस्थितीची माहिती देणे. कोरोनाची संपूर्णपणे साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे थोरात यांनी सांगितले.
आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे ,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मिराताई शेटे ,पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर ,उपसभापती नवनाथ आरगडे ,जि.प. सदस्य अजय फटांगरे, डॉ. हर्षल तांबे ,रामहरी कातोरे,मिलिंद कानवडे, विष्णुपंत रहाटळ, बी.आर.चकोर, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर ,गट विकास अधिकारी डॉ.सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर आदी बैठकीला उपस्थित होते.