अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील बोधेगावात सेंट्रल बँकेचे एटीएम तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गॅस कटरने एटीएम मशीन फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थाने हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोरांनी गॅस कटर व अन्य साहित्य जागीच टाकून पलायन केले. संबंधित प्रकार पाळीव कुत्र्यामुळे उघडीस आल्याने लाखोंची रक्कम वाचली आहे.
बोधेगामधील शेवगाव-गेवराई राज्य मार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम आहे. रविवारी पहाटे या ठिकाणी चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवाजामुळे बँकेच्या दारातील पाळीव कुत्रा भूंकायला लागला. याठिकाणी रोजंदारीवर काम करत असलेल्या साहिद शेख व बाबा सय्यद हे दोघे बँकेच्या दिशेने जात असताना त्यांना हा प्रकार दिसला.
शंका आल्याने त्यांनी तत्काळ जवळच वास्तव्यास असलेले बँकेचे जागा मालक प्रभाकर हुंडेकरी यांना माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केला. यामुळे दरोडेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यांनी तत्काळ जवळच वास्तव्यास असलेले बँकेचे जागा मालक प्रभाकर हुंडेकरी यांना माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केला. यामुळे दरोडेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. दरोड्यात वापरण्यात आलेले गॅस कटर तसेच दोन गॅस टाक्या व अन्य साहित्य चोरट्यांनी जागीच टाकून दिले.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वामन खेडकर, नाईक अण्णा पवार तसेच नामदेव पवार, हरी धायतडक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यांनंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यांसोबत श्वान, ठसे तज्ञ पथक दाखल झाले. शाखाधिकारी दिगंबर कदरे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाळीव कुत्र्यामुळे दरोडेखोरांचा सुगावा
रोजंदारीवरील कर्मचारी अकबर सय्यदचा भाचा साहिद शेख हा एटीएमची देखभाल करतो. यांनी दिलेल्या अन्नावरच हा कुत्रा बँकेच्या परिसरात वावरतो. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कुत्रा जोरजोराने भूंकू लागला. त्याच्या आवाजाने बाबा सय्यद जागे झाले. कुत्रा बँकेच्या दिशेने भूंकत होता. तसेच याच ठिकाणी घुटमळत असल्याने सय्यद यांना संशय आला; आणि त्यांनी संबंधित प्रकार उघडकीस आणला. कुत्र्याची सतर्कता आणि प्रभाकर हुंडेकरी यांनी रिव्हॉल्वर मधून गोळीबार केल्याने दरोडेखोरांनी पोबारा केला.