शिर्डी - आज आषाढी एकादशी. प्रतिवर्षी आषाढीवारीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा भरतो. त्याच प्रमाणे या दिवशी शिर्डीतही या आषाढी एकादशीच एक वेगळ महत्व आहे. साईबाबाच्या शिर्डीलाही भाविकांकडून प्रति पंढरपूर समजले जाते. तसेच शिर्डी माझे पंढरपूर ही आरती देखील रोज साईच्या मंदिरात म्हटली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूरला जाता न आल्याने भाविकांनी शिर्डीत साईंचे दर्शन घेऊन आपली वारी पोहोच केली आहे. मात्र या ठिकाणीही भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच आषाढी साजरी करावी लागली.
प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी पंढरपूरची वारी पार पाडतो. तर अनेक साईंच्या शिर्डीतूनच आषाढीनिमित्त आपल्या पांडुरंगाचे दर्शन करतात. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच दिंड्या रद्द झाल्या आहेत. वारकऱ्यांना पंढरीला न जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्याच प्रमाणे शिर्डीतही दर्शनासाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
आज आषाढी एकादशीनिमित्त साईंच्या मूर्तीला पंरपरेप्रमाणे तुळशीची माळेसह सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले आहे. तसेच साई समाधीजवळ विठूरायाची प्रतिमा ठेऊन पूजा करण्यात आली आहे. आज एकादशीनिमित्त साई मंदिरातील नित्याच्या धुप आरती वेळी आधी विठ्ठलाची आरती आणि त्यानंतर साईबाबांची आरती करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी दिली.
साईच्या नैवेद्यातही आज शाबुदाना खिचडी आणि भगर असते. दरवर्षी साईबाबांच्या प्रसादालयात ७५ क्विटंल शाबुदाना खिचडी करुन ती भक्तांना प्रसाद म्हणून दिली जाते. मात्र या वर्षी कोरोनामुळे प्रसादालय बंद असल्याने केवळ आवशक लोकासाठी पाचशे किलोचीच खिचडी बनविण्यात आली. दरम्यान आषाढी निमित्ताने निघणारा पालखी सोहळाही आज होणार नाही. गेल्या तेरा वर्षा पासुन शिर्डीतुन पंढरपुरला साईबाबांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जात होत्या. मात्र यंदा ती पंरपरा खंडीत झाली आहे.