श्रीरामपूर(अहमदनगर) : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. युपीए अध्यक्षपदासाठी सातत्याने शरद पवारांच्या नावाची शिफारस करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी खडे बोल सुनावले आहेत. युपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहिल, राऊत यांच्या बोलण्याने युपीएचे अध्यक्ष बदलत नाहीत असा टोला थोरात यांनी राऊत यांना लगावला आहे. ते श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
युपीएचे नेते ठरवतील अध्यक्ष कोण ते - थोरात
युपीएचे नेतृत्व कुणी करावे हे संजय राऊतांच्या बोलण्याने ठरत नसते. युपीएचे देशभरातील नेते मिळून याविषयी निर्णय घेतात. त्यामुळे राऊत यांनी याविषयी बोलण्याची गरज नाही अशा शब्दांत थोरात यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. काँग्रेसचे आज कठिण दिवस आहेत. मात्र यातूनही काँग्रेस नक्कीच उभारी घेईल. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. आमच्या नेतृत्वातही ती क्षमता आहे. त्यामुळे युपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
कृषी कायदे शेतकरी विरोधी
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सक्रीय पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरातांनी श्रीरामपूरमध्ये लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी कृषी कायद्यांतील तरतूदी शेतकरी विरोधी असल्याचे ते म्हणाले. यावरून केंद्र सरकारवरही टीका त्यांनी केली. तसेच मुंबईत सापडलेल्या जिलेटन आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येवरुन लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठी काही प्रयत्न झाल्याची टीकाही त्यांनी केली.
हिरेन प्रकरणातील सत्य बाहेर येईल
हिरेन प्रकरणातील सत्य बाहेर येत असून राज्याचे मुख्य सचिव सांगत आहेत, की राज्याची वस्तुस्थिती काय आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारवर आणि देशमुखांवर जे आरोप करण्यात आलेत त्यातील सत्य बाहेर येईल. यात सरकारचा दोष नाही हा एका कटाचा भाग आहे. काही अधिकारी त्या कारस्थानाला बळी पडून आरोप करतात हे येत्या काही काळात स्पष्ट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनची करण्याची इच्छा नाही
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. राज्यात लॉकडाऊन करण्याची आमची इच्छा नाही. मात्र नागरिक जर काळजी घेत नसतील आणि रोज रुग्ण वाढत असतील तर आम्हाला पर्याय राहणार नाही असेही थोरात यावेळी म्हणाले.
नाना पटोलेंकडूनही राऊतांवर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही युपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? 'जो पक्ष यूपीएमध्ये नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही' अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना मुंबईत बोलताना टोला लगावला. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, तरीही राऊत बोलत आहेत. शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? नाना पटोलेंचा प्रश्न