अहमदनगर- दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेली ट्रॅक्टर रॅली थेट दिल्लीमध्ये गेली. लाल किल्ला या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी आणि देशाला काळीमा असलेली घटना असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, वास्तविक देश शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांसाठी आज राळेगणसिद्धी परिवाराने ट्रॅक्टर रॅली काढली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे गैर नाही. मात्र, कोणतेही आंदोलन हे घटनेने दिलेल्या अधिकारात झाले पाहिजे. घटनेमध्ये कोणत्याही हिंसेला थारा नाही. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेले हिंसात्मक आंदोलन हे मोठे दुर्दैव आहे. देशाला काळिमा असल्याचे अण्णांनी स्पष्टपणे म्हटले आहे. हा देश घटनेच्या आधारावर व लोकशाही माध्यमातून काम करत आहे. यात आंदोलन करणे चुकीचे नाही. मात्र, देशातील प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता ही जनतेच्या मालकीची आहे. तिचे नुकसान जनतेनेच करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात हिंसा होत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नसल्याचे अण्णा यांनी परखड मत व्यक्त केले.
हेही वाचा-किसान ट्रॅक्टर मार्च : हिंसाचारानंतर मोर्चा स्थगित; शेतकऱ्यांना सीमेवर परतण्याचे निर्देश..
पुढे ते म्हणाले की, आयुष्यात मी आतापर्यंत 40 आंदोलन केली आहेत. दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर केलेल्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले. देशभर लाखो लोक रस्त्यावर आले. मात्र, कुठेही साधा एक दगडही कुणी हातामध्ये घेतला नाही. सरकारला माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून माहितीचा अधिकार, लोकपाल असे अनेक कायदे करावे लागले आहेत. हे सर्व आंदोलने मी महात्मा गांधीच्या मार्गावर सत्याग्रहाच्या मार्गाने आणि अहिंसा तत्त्वावर केले आहेत. अहिंसावादात मोठी ताकद आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग कोणीही अवलंबू नये. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गावर कराव्यात अशी अपेक्षा अण्णांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-72 Republic Day Celebration: राजधानी दिल्लीत राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
काय घडले आज दिल्लीच्या आंदोलनात?
दिल्लीमध्ये आज केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडत दिल्लीमध्ये प्रवेश केला. तर, पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रुधुर आणि लाठीचार्जचा वापर केला. दिल्लीमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या या हिंसाचारात कित्येक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. तसेच, पोलिसांनी बॅरिकेट्स म्हणून वापरलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.