शिर्डी : महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस तसेच अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अजित नवलेंना एका इसमाने गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. ‘नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन’ अशी धमकी एका इसमाने नवले यांना दिली आहे.
कायदेशीर कारवाई करणार-नवले
एका इसमाने गुरुवारी फेसबुकवर पोस्ट टाकून ही धमकी दिल्याची माहिती डॉ. अजित नवलेंनी दिली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदविला आहे. देशभर केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेले शेतकरी आंदोलन दडपून टाकण्याच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं नवले यांनी म्हटले आहे.
धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा-आडम
फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाइक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करेल, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी दिली आहे.
डॉ. लहामटेंकडून निषेध
डॉ. लहामटे यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. सोशल मिडीयावरुन गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या नथुरामी विचारांच्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी. तसेच शासनाच्या वतीने डॅा.नवलेंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण दिले पाहिजे यासाठी आपण भूमिका घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. धमकी देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- डॉ. तात्याराव लहाने