अहमदनगर - ट्रकचालकाचा खून करून, त्याच्याकडील ट्रक आणि त्यामधील 74 लाख रुपये किंमतीच्या दूध-पावडरची पाकिटे पळवणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत, पुण्यातून या सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या सामानासह इतर असा एकूण 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
31 डिसेंबर 2019ला नवनाथ गोरख वलवे (32) हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधून 74 लाख रुपये किंमतीच्या दूध-पावडरची पाकिटे घेऊन ओरिसा राज्यातील कटक येथे निघाला होता. वाटेत अहमदनगर येथे अशोक मुंढे, रोहित बनसोडे, महेश शिंदे, ज्ञानेश्वर राऊत, शिवाजी पाटील आणि रविराज बनसोडे यांनी मिळून नवनाथचा तीक्ष्ण हत्यारांनी निर्घृण खून केला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह नगर बायपास रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ फेकून दिला. आरोपींनी त्यानंतर नवनाथ याच्याजवळील ट्रक पुण्याला पळवून नेला. ट्रकमधील दूध पावडर त्यांनी पुण्यातील शाहीद इस्माईल शेख या व्यापाऱ्याला विकली.
दरम्यान, नवनाथ याच्या खुनाबाबत नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करत असताना, गुन्हे शाखेने इंदापूर ते नगर बायपास येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून या गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा छडा लागला.
या टोळीचा सूत्रधार अशोक मुंढे हा मूळचा बीड जिल्हातील रहिवासी असून, तो सराईत गुन्हेगार आहे. या सर्व आरोपींसह, चोरीचा माल विकत घेणाऱया पुण्यातील व्यापाऱ्यावरही विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केला हा तपास केला.
हेही वाचा : महसूल व पोलीस प्रशासनाची धडक कारवाई; जामखेडमध्ये १०० ब्रास वाळूसाठा जप्त