अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ शासनावर आली आहे. त्यामुळे धरण उशाला कोरड घशाला असा राग लावण्याची वेळ या आदिवासी भागातील जनतेला आली आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जनता आज आज टँकरच्या प्रतीक्षेत आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांसमोर पाण्याची मोठी समस्या आ वासून उभी आहे. उडदावणे हे आदिवासी पाड्यातील गाव व त्याच्या तीन वाड्यांना मिळून तीन पाण्याचे टँकर येतात पण या पाण्यावर जनतेला पुरेसे पाणी भेटत नाही असल्याची तक्रार या गावातील आदिवासी महिला सुमनबाई धिंदळे यांनी केली.
भंडारदरा धरण हे ११ टीएमसीचे आहे. या धरणांमध्ये यावर्षी आजच्या तारखेला ९०८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातील मृतसाठा ३०० इतका आहे म्हणजे या धरणातील फक्त ६०० दशलक्ष घनफूट पाणी वापरले जाऊ शकते गतवर्षी याच धरणांमध्ये तीन हजार ९१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता तर या धरणाच्या खालील निळवंडे धरणांमध्ये आजच्या तारखेला ८४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या धरणात १८५७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या धरणाचा मृतसाठा २६५ दशलक्ष घनफूट इतका असून या धरणात ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच दोन्ही धरणांचा विचार केला तर सव्वा टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून वळीवाच्या पावसाने डोळे वटारलेले आता पुढील दोन महिने नदीकाठच्या गावांना आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील लाभ क्षेत्रातील गावांना हे पाणी पुरवण्याचे मोठे संकट जलसंपदा विभागात पुढे उभे आहे.
भंडारदरा धरणाच्या आदिवासी पट्ट्यामध्ये हे चार महिने पाऊस व पुढील आठ महिने पाण्यासाठी भटकंती असे विसंगत चित्र यापूर्वी अभावानेच निर्माण झाले होते. यावर्षी मात्र धरणातील पाणी साठी रिते केले गेले आणि त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना आणि पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत. गावाला एक टँकर येतो आणि हा टँकर खाली होताच गावाच्या वेशी पर्यंत पोहोचत नाही तोच या पाण्याचा रिता केलेला विहिरीतील पाणीसाठा संपून गेलेला असतो, अशी तक्रार दत्तू बुधा निरगुडे यांनी केली. उडदावणे गावाला गांगडवाडी, आहीरवाडी, फणसवाडी अशा तीन वाड्या आहेत. या प्रत्येक वाडीमध्ये हे प्रत्येक वाडीच्या सार्वजनिक विहिरी मध्ये अर्धा टँकर खाली केला जातो, असे दररोज दोन टँकर येथे येतात त्यातील अर्धा टँकर पुन्हा उडदावणे गावात विहिरीत टाकला जातो म्हणजेच गावाला आणि वाड्यांना दोन टँकर असे मिळून तीन टँकर पाणी आजही या गावाला पुरत नाहीत. आणखी धोक्याची बाब म्हणजे ज्या विहिरीत हे पाणी टँकरने टाकले जाते त्या विहिरीला कठडा नाही विहिरीच्या काठावर होणारी गर्दी पाण्यासाठी निर्माण होणारी पाणी भरण्यासाठी जमा होणारी झुंबड आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या कुरबुरी या नेहमीच कटकटीच्या गोष्टी तयार होतात अशा प्रकारची तक्रार या गावातील राहीबाई गिरे यांनी तक्रार केली.
पाणी वाहण्यासाठी तांत्रिक आयुधांचा वापर करून गावातील दत्तू बुद्धा निरगुडे यांनी एक ढकलगाडी तयार केली आहे.त्यासाठी मोटारसायकलच्या जुन्या टायरसह इतर लोखंडी पट्ट्यांचा वापर करून ढकलगाडी सारखी त्याने तयार करून त्यावर पाण्याचा पाण्याचे टीप हांडे तो त्यावर ठेवतो आणि उताराने ताबा ठेवत ढकलत तो आपल्या घरापर्यंत हा पाणीसाठा घेऊन जातो.
त्यामुळे गावासाठी आणखी पाणी वाहणारे टँकर वाढवावेत, अशा प्रकारची अपेक्षा अनुसया गिरी यांनी व्यक्त केली. पतंगाची काटाकाटी चालावी तशा प्रकारचे आमच्या विहिरीत पडणाऱ्या बादल्या आणि त्याच्यामुळे पाणी कधी उपसतो आणि घराकडे कधी जातो अशा प्रकारची आमची मनस्थिती असते असेही त्या म्हणाल्या. पाण्यासाठी दिवसभर याठिकाणी वेळ जात असल्यामुळे जनावरांचे पूर्णपणे हाल होत असल्याचेही ते म्हणाले. यापुढे पाणी सोडताना या भागातील आदिवासी जनतेसाठी किमान पाच टक्के पाणी राखीव ठेवले जावे आणि हे पाणी कायम टिकवण्यासाठी बुडीत बंधारे बांधले जावेत, अशी या भागातील जनतेची मागणी आहे.