अहमदनगर - अमरावती शहरातून अपहरण करून नगर शहरात आणलेल्या नयन मुकेश लुणीया या चार वर्षीय मुलाची सुखरूप सुटका अहमनगरच्या जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच आरोपींना ताब्यात घेऊन अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण-
१७ फेब्रुवारीला अमरावती शहरातून नयन मुकेश लुणीया (राहणार-भुतेश्वर चौक, अमरावती) या चार वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. आपल्या आजी सोबत रस्त्याने जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या एक महिला आणि पुरुषाने नयनचे अपहरण केले होते. या प्रकरणी अमरावतीच्या राजावाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपहरणकर्ते निघाले नगर शहरातील -
अपहरणकर्ते हे नगर शहरातील असल्याचा कयास अमरावती पोलिसांना असल्याने अहमदनगर आणि अमरावती पोलिसांनी नगर शहरात तपास सुरू करून तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला आणि अपहरण झालेल्या चिमुकल्या नयनची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका महिलेसह पाच आरोपींना ताब्यात घेऊन अमरावती पोलिसां कडे वर्ग करण्यात आले आहे. या अपहरण प्रकरणात अजून एका महिलेसह चार आरोपी फरार आहेत. अपहरण झालेल्या चार वर्षीय नयनचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले याबाबत उलगडा झालेला नसला तरी खंडणी साठी नयनचे अपहरण झाले असावे असा कयास आहे. ताब्यात घेण्यात आलेली महिला हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे ही या अपहरणाची मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस मामांनी नयनला कडेवर घेऊन साजरा केला आनंद -
अपहरणकर्त्यां कडून सुटका झाल्या नंतर चिमुरड्या नयनच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पोलीस मामांनी त्याला कडेवर उचलून आणले त्यावेळी त्याने दोन बोटे उंचावून व्हिक्टरीचा संदेश दिला. अपहरण झाल्यानंतर तीन दिवसांत पोलिसांनी एकीकडे नयनची सुटका करत आरोपींना गजाआड केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
तपासकामी चार पथके होती कार्यरत -
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना अमरावती पोलिसांनी अपहरणाची माहिती देताच जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तीन वेगवेगळी पथके तयार केली. जोडीला अमरावती पोलिसांचे एक पथकही नगरमध्ये दाखल झाले होते. प्राप्त माहिती आणि तांत्रिक आधार घेत या चारही पथकांनी तीन दिवस अहोरात्र शोधकार्य सुरू ठेवले. सुरुवातीला एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, नयन इतर दोन आरोपींकडे होता. त्यांचा पोलिसांनी माग काढत कल्याण बायपास रोडवर त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यावेळी नयन त्यांच्याकडे सापडला.
हे आहेत अपहरणकर्ते -
हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय 25), अल्मश ताहीर शेख (वय 18), आसिफ हिनायत शेख (वय 24), फैरोज रसिद शेख (वय 25 चौघे रा. कोठला, नगर), मुसाहीब नासीर शेख (वय 21 रा. मुकुंदनगर, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपींचे नावे