अहमदनगर: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळेसही विजय मिळवला आहे. त्यांच्या गटांनी 18 शून्य असा दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊनही काहीही उपयोग झाला नाही. हे यश जनतेचा असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा फायदा अधिक कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करू असेही शिवाजी कर्डिले म्हणाले.
नगर बाजार समितीवर भाजपची सत्ता: अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला चांगले यश मिळाले आहे. येणाऱ्या काळात भाजपाला मोठे यश मिळेल असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बाजार समिती असलेल्या नगर बाजार समितीवर भाजपची सत्ता आली. पाथर्डी येथे देखील भाजपकडे बाजार समितीच्या चाव्या आल्यात. श्रीगोंदा बाजार समिती च्या सत्तेच्या चाव्या हया भाजपकडे असल्याने होणारा सभापती हा भाजप ठरवेल. कर्जतमध्ये देखील समान जागा आल्याने भाजपचा सभापती होईल असा विश्वास खासदार सुजय विखे म्हणाले.
निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे: अहमदनगर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजयराव औटी एकत्र आल्याने 18 पैकी 18 जागा निवडून आणण्यात, आजी-माजी आमदारांना यश आले आहे. या निवडणुकीत आमदार निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे असे पाहिले जात होते त्यात लंके यांनी बाजी मारली.
काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम: पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागांवर आजी-माजी आमदारांनी एक हाती सत्ता आणली आहे. 18 च्या 18 उमेदवार निवडून आल्याने निवडून आलेल्या आमदारांची पारनेर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नंतर मिरवणुकीच कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सभेत रूपांतर झाले. या निवडणुकीत खासदार सुजय विखे यांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आपली ताकद लावली होती, यावर राजकीय वैर असलेले माजी आमदार विजय औटी यांच्यासोबत आमदार निलेश लंके यांनी हात मिळवणे केली होती. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता आणण्यात लंके यांना यश आले आहे. जिल्ह्यात बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. काही ठिकाणी भाजपने तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असल्याचे पाहायला मिळाले.