अहमदनगर - आज 74 व्या स्वातंत्रदिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा स्वातंत्र्यदिन सोहळा जिल्हा मुख्यालयात न होता जिल्हाधिकारी कार्यालयात आटोपशीर पद्धतीने आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित होते.
झेंडावंदन सोहळ्यानंतर मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी सध्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल भाजपवर टीका केली. फडणवीसांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि त्यांच्याकडे बिहार निवडणुकीत प्रभारी पद देणे यात राजकारण असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री असताना ज्या फडणवीसांनी पाच वर्षे गृहखाते सांभाळले, त्यांनीच आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणे दुर्दैवी असल्याचे मुश्रीफ यावेळी म्हणाले.
वाढती रुग्णसंख्या हे आव्हान
नगर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, यामागे आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरू केले आहे, हे कारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड उपलब्ध होणे आणि अत्यवस्थ रुग्णांना ठीक करून मृत्युदर कमी करणे हे आरोग्ययंत्रणेसाठी आव्हान असल्याचे ते म्हणाले.