अहमदनगर - नगर दक्षिणचे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ रविवारी एका प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची महाआरती करून या रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, भारतीय जनता पक्षाचे अॅड. अभय आगरकर, सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या रॅलीमध्ये खासदार दिलीप गांधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. खासदार गांधी हे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांची उपस्थिती अपेक्षित असली, तरी ते आज या रॅलीमध्ये सहभागी झाले नाहीत. मात्र, त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी आपली उपस्थिती यावेळी दाखवली. रॅलीच्या निमित्ताने बोलताना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी युतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी नगर शहरात आणि दक्षिण नगर जिल्ह्यात अनुकूल वातावरण असून पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर मतदारांचा उत्साह द्विगुणीत झाल्याने डॉ. सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुवेंद्र गांधी यांनीही जिल्ह्यात सर्वत्र प्रचार सुरू असल्याचे आवर्जून सांगताना डॉ. सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, माझे वडील तीन वेळेस खासदार राहिले आहेत आणि आता चौथ्यांदा सुजय विखे हे भाजपकडून निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास सुवेंद्र गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होत असल्याने रॅली दरम्यान आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.