अहमदनगर- कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देत शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे सर्व सदस्य तसेच शहरातील खासगी डॉक्टरांनी दिल्लीगेट पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले आहे.
'आयएमए'च्या घोषणेनुसार, सोमवारी(दि.१७) सकाळी सहा पासून ते मंगळवार (दि.१८) पर्यंत २४ तास शहरातील ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत, अशी माहिती नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.शंकर शेळके यांनी दिली आहे.
या आहेत मागण्या -
देशभरासह राज्यातील हजारो डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. डॉक्टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचबरोबर डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी देखील संघटनेने केली आहे. महाराष्ट्रात २०१० मध्ये संबधीत कायदा करण्यात आला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
या मोर्चात नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.शंकर शेळके, सेक्रेटरी डॉ.अनिल सिंग, डॉ.अमित खराडे, उपाध्यक्ष डॉ. सागर वाघ, डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ. निसार शेख, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ. महेश वीर, डॉ. रवींद्र साताळकर आदी डॉक्टर्स सहभागी झाले होते.