अहमदनगर- ज्या जिल्ह्यांमध्ये पंधरापेक्षा कमी रुग्ण आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २७ असली, तरी तीन रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. अनेक रुग्ण हे विदेशी, परप्रांतीय आहेत. त्यामुळे अहमदनगरच्या रुग्णांचा विचार केला, तर नगरमध्ये ही संख्या १५ पेक्षा कमी आहे. त्यामुळेच राज्य शासनाने अहमदनगरचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये केला आहे.
नगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच राहणार आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. मात्र, ऑरेन्ज झोनमध्ये समावेश झाल्याने नगरकरांना दिलासा मिळणार आहे. रुग्ण संख्येनुसार जिल्ह्यांचे रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोन करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तीन झोनची निर्मिती करण्यात आली आहे.
![अहमदनगरचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-01-corona-orenj-zone-image-7204297_13042020091604_1304f_1586749564_41.jpg)
१५ पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत. १५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेले जिल्हे ऑरेन्ज झोनमध्ये गेले आहेत, तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. २७ रुग्ण असूनही अहमदनगर जिल्ह्याचा ऑरेन्ज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. रुग्ण संख्या २७ असली तरी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. आठ रुग्ण परप्रांतीय व विदेशी आहेत. २७ मधून बारा वजा केले असता १५ रुग्णसंख्याच राहते. जे रुग्ण मुळचे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नगरचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये केल्याची शक्यता आहे.