अहमदनगर - नगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी नामनिर्देशनपत्र मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करण्यास वेळ दिला आहे. बुधवारी ऑनलाइन पद्धतीने मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
ऐनवेळी भाजप काय खेळी करणार याकडे सर्वांच्या नजरा -
नगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. या दोन्ही पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत समझोता झाला आहे. महापौर पद शिवसेनेकडे तर राष्ट्रवादीकडे उपमहापौर पद राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय राहणार याकडे लक्ष आहे. तर ऐनवेळी भाजप काय खेळी करणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर या सगळ्या राजकारणामध्ये कोणाच्या गळ्यात महापौर-उपमहापौर पदाची माळ पडणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. दरम्यान निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम आणि प्रक्रिया -
शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशनपत्र घेणे आणि दाखल करण्यासाठी सोमवारी व मंगळवारी (28 व 29 जून) हे दोन दिवस असणार आहेत. नामनिर्देशन पत्र मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येतील. नंतर दुसर्या दिवशी बुधवारी सकाळी 11 वाजता महापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या अगोदर दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होईल. याच पद्धतीने उपमहापौर पदाची प्रक्रिया असणार आहे. दरम्यान नामनिर्देशन पत्र हे महापालिकेतील नगर सचिव कार्यालयांमध्ये उपलब्ध होतील, असे नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष -
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी तीनही पक्षाच्या नेत्यांनी ही आघाडी पुढे वीस ते पंचवीस वर्ष राहू शकते असे वक्तव्य केले आहे. तरी काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीन पक्षांची आघाडी ही विधानसभेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा वारंवार दिला आहे. यावरून या तिन्ही पक्षात राज्यस्तरावर काहीशी चलबिचल अशी परिस्थिती आहे. कदाचित त्यामुळेच की काय, नगरच्या महापौर निवडणुकीत सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला ठेवल्याने काँग्रेसमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेस केवळ पाच नगरसेवक यांच्या बळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत सध्यातरी दिसून येते. काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. थोरात हे काँग्रेसच्या नगरसेविका शीला दिलीप चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र सेना-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसला खड्यासारखे बाजूला ठेवलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर थोरात राज्यस्तरावर सेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन काही चमत्कार घडवतात का याची उत्सुकता आहे.
2018 च्या पुनरावृत्तीबद्दल शिवसेनेत धाकधूक -
2018 ला झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती एकत्र लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. यात शिवसेनेला सर्वाधिक 23 तर भाजपला तिसऱ्या क्रमांकाच्या 15 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी लागणारा 34 नगरसेवकांचा जादूई आकडा यूती गाठत असतानाही त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि भाजपनेही हा पाठिंबा घेत आपला महापौर-उपमहापौर निवडून आणला. त्यामुळे सर्वाधिक 23 नगरसेवक असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यावेळी शिवसेनेला टोकाचा विरोध करणारी राष्ट्रवादी आता मात्र सेनेबरोबर आघाडी करत काँग्रेसला बाजूला ठेवू पाहात आहे. भाजपकडे अनुसूचित जाती जमाती महिला उमेदवार नसल्याने मावळते महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भाजप महापौर निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र काँग्रेसने शीला दिप चव्हाण यांचा अर्ज दाखल केला तर सेनेला विरोध म्हणून स्थानिक पातळीवर भाजप वरिष्ठांच्या संमतीने आश्चर्यकारक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे संकेत मावळत्या महापौरांनी दिले आहेत. राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक संघ आहेत. मात्र शिवसेनेत अशी परिस्थितीनसून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत. यातील राठोड गट काँग्रेसने उमेदवारी दाखल केल्यास काय भूमिका घेतो यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. बहुजन समाजवादी पक्षाचे चार आणि अपक्ष एक असे पाच नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांना मानणार मानणारे आहेत. सध्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने आघाडी केली असली तरी राष्ट्रवादीला शहरात शिवसेनेचे वर्चस्व नको आहे. त्यामुळे 2018 साली जशा आश्चर्यकारक घटना घडत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपचा महापौर झाला. तसेच काही केवळ पाच नगरसेवक असलेल्या काँग्रेसबाबत झाल्यास नवल वाटायला नको. असे राजकीय विश्लेषक सांगताहेत. त्यामुळे निवडणुकीला केवळ पाच दिवस बाकी असल्याने यादरम्यान पडद्याआड अनेक गोष्टी घडणार आहेत. असे झाल्यास शिवसेनेला पुन्हा एकदा महापौर पदापासून दूर राहावे लागणार आहे.
असे आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल-
- शिवसेना 23 नगरसेवक
- राष्ट्रवादी 19 नगरसेवक
- काँग्रेस 5 नगरसेवक
- भाजप 15 नगरसेवक
- बसपा चार नगरसेवक
- अपक्ष एक नगरसेवक
- रिक्त जागा एक
- एकूण विद्यमान नगरसेवक 67
- बहुमताचा जादुई आकडा 34 नगरसेवक
हेही वाचा - अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी सेना-राष्ट्रवादीत युती, काँग्रेसचा तीव्र संताप...पाहा व्हिडिओ