अहमदनगर - जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला असल्याची माहिती पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तो पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी जवानाला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
काय केले या जवनाने
अटकेतील जवान हा २०१९ पासून पंजाबमध्ये कर्तव्यावर आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेशी (एजंटाशी) त्याचा संपर्क झाला. त्यानंतर त्याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केेला. या ग्रुपमध्ये त्याने पाकिस्तानी महिला एजंटालाही समाविष्ट केले. त्यामुळे ग्रुपमध्ये पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कोठे आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कोठे असणार आहे. याची माहिती जवान ग्रुपवर एकमेकांना देत असत. ती माहिती त्या महिलेला मिळत होती. ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.
पंजाब स्टेट ऑपरेशन सेलने केली कारवाई
या हेरगिरीची माहिती कळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी जवानाला ताब्यात घेऊन चौकशी केली. माहितीत तथ्य आढळून आल्यानंतर चौकशीनंतर पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने जवानाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -स्मृतीदिन : 'केमिकल वॉर' म्हणजे काय? जगभरातील युद्ध पीडितांचं स्मरण
हेही वाचा -पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवली थेट मंत्र्याची गाडी; दुसऱ्यादिवशी झाला 'सत्कार'