अहमदनगर - राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज २९४ वा जयंती सोहळा चौंडी या त्यांच्या जन्मगावी उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने अहिल्याबाईंचे वंशज आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नियोजनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी अहिल्याबाईंच्या जन्मस्थळाला भेट दिली. यानंतर उदयनराजे यांनी अहिल्याबाई होळकर जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली. तसेच भाजप सरकार गेली ५ वर्षे सत्तेत आहे. मात्र, त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून दिला नाही. तसेच धनगर आरक्षण मिळवून दिले नाही. त्यामधून सरकारचा फक्त नाकर्तेपणा दिसून येत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदी नेते भेट देत आहेत. तसेच पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दुपारच्या सुमारास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.