अहमदनगर - भाजपच्या मेगा भरती नंतर आता नगर जिल्हा जवळपास भाजपमय झाला आहे. लोकसभेला विखे-पाटील त्यानतंर आता पिचड परिवाराच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा परिषदे पाठोपाठ जिल्हा सहकारी बँकसुद्धा भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर सध्या एकहाती भाजपचे वर्चस्व असणार आहे. उत्तरेत विखे-पिचड तर दक्षिणेत राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे या नव्या-जुन्या भाजप नेत्यांपुढे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले बाळासाहेब थोरात कसे आणि किती तोंड देणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
पिचडांच्या भाजप प्रवेशाने अकोल्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. तर इतर ठिकाणी राष्ट्रवादीचे छोटे-छोटे संस्थानिक भाजप-सेनेच्या एकत्रित प्रबळ शक्तीचा सामना करू शकतील का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंनी जिल्ह्यात विधानसभेला 12 विरुद्ध शून्य असा निकाल लागेल, असे भाकीत व्यक्त केले होते. त्यांनी केलेले भाकीत खरे ठरेल, अशी राजकीय परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जरी नगर जिल्ह्यातील असले तरी संगमनेर वगळता काँग्रेस ही भिंगातून शोधावी लागेल, असे आता गमतीने म्हटले जाऊ लागले आहे. 2014 पर्यंत जिल्ह्यात आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून वर्चस्व गाजवणारे नेतेच भाजपमध्ये गेल्यामुळे कधी नव्हे ती एवढी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर आली आहे. आता काँग्रेसची सर्व मदार बाळासाहेब थोरतांवर तर राष्ट्रवादीची मदार रोहित पवार यांच्या खांद्यावर असणार आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या बाबतीत पण ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. असे झाले तर पक्षाची अवस्था अजून वाईट होऊन येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्ष धारातीर्थी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे.
भाजप आता नव्या नेत्यांच्या वर्चस्वाखाली -
जिल्ह्याच्या उत्तरेतील विखे-पिचड परिवार आता भाजपवासी झाल्याने पक्षावर उत्तरेचे वर्चस्व वाढणार आहे. तर मूळ भाजपमधून निष्ठावान आणि दक्षिण नगर जिल्ह्यातून येणारे मंत्री राम शिंदे यांचे महत्व कमी होणार असे बोलले जात आहे. विखे कुटुंबात सध्या मंत्रिपद आणि खासदारकी असल्याने जिल्ह्याच्या उत्तर-दक्षिणेत आता विखे परिवाराचा बोलबाला असणार आहे. मात्र, या सर्व मेगाभरती मध्ये जुने निष्ठावान भाजप नेते-कार्यकर्त्यांची कुचंबणा होण्याची शक्यता असून भविष्यात जुने-नवे अशा संघर्षाची शक्यताही नाकारता येत नाही.