अहमदनगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अॅड. उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विश्वासातले काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पवारांचा आदेश आणि थोरतांचा पुढाकार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली होती. यामध्ये अॅड. उदय शेळके विक्रमी मतांनी निवडून आले होते. बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी बँकेच्या स्व.मारुतराव घुले सभागृहात झालेल्या निवडीत अॅड. उदय शेळके यांचे नाव एकमताने अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या निवडीसाठी नगरमध्ये तळ ठोकून होते. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी त्यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केले. पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमास बँकेवर बिनविरोध निवडून आलेले संचालक आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते.
हेही वाचा - अपहरण झालेले बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
उदय शेळकेंना बँकिंगचा गाढा अभ्यास
अॅड. शेळके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तीनवेळा निवडून आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी बँकेचे उपाध्यक्षपद देखील भूषविलेले आहे. तसेच जीएस महानगर बँकेचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली जीएस महानगर बँकेने मोठी प्रगती केलेली आहे. ते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील आहेत.
उपाध्यक्ष कानवडे थोरातांचे कट्टर समर्थक
उपाध्यक्षपदी निवड झालेले कानवडे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विश्वासातील ते आहेत.
जिल्हा बँकेतील विखे पर्व संपले
राज्यात सत्तेत कोणताही पक्ष असो मात्र नगर जिल्ह्यात सत्ता आणि वर्चस्व असते ते विखे-थोरतांचे. जिल्हा परिषद असो वा जिल्हा बँक, विखे-थोरात हाच पक्ष मानणारे कार्यकर्ते-नेते त्यांचेच ऐकून निर्णय घेत असतात. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे संभाव्य सत्तेच्या अपेक्षेने भाजपात गेले. मात्र राज्यातील एकूणच राजकीय गणित बदलले आणि ते विखेंना मारक तर थोरतांना तारक ठरले. त्यामुळेच जिल्ह्यात भाजपचे काही संचालक निवडणून आले तरी त्यातील काहीजण थोरतांच्या तर काहीजण पवारांच्या ऐकण्यातले होते, त्यामुळे जिल्हा बँकेत विखेंनी शांत राहणे पसंत केले आणि पदाधिकारी निवडणूक बिनविरोध पार पडली. एकूणच जिल्हा परिषदे प्रमाणे जिल्हा बँकेत विखे सध्या बॅकफूटवरच म्हणावे लागतील. तीच परस्थिती विखेंची राज्यातील राजकारणात आहे.
हेही वाचा - गडी ऐकतच नाही..!! अशोक चव्हाणांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान - नरेंद्र पाटील