अहमदनगर - शहरातील एका हॉटेलमध्ये 6 मे रोजी तरुणावर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणाचे गूढ उलगडले असून प्रेमप्रकरणातून राग धरलेल्या प्रियसीनेच हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीच्या अमीर रशीद शेख याच्यावर आरोपी प्रेयसी अंजुम अजमेर शेख हिने हा हल्ला केला असल्याचे तोफखाना पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
अॅसिड हल्यात अमीर रशीद शेख जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 6 मे रोजी हॉटेलवर बोलावून अंजुमने अचानक अॅसिड ओतून तेथून पळ काढला होता. हल्याच्या वेळी आरोपी अंजुमने बुरखा धारण केला होता. मात्र, जखमी झालेल्या अमीरसोबत असलेल्या मित्राने चेहरा झाकलेल्या व्यक्तीचे लांब केस असल्याने हल्लेखोर तरुणी असण्याची शंका व्यक्त केली होती. या आधारावर अंजुमला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. तिची तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर अंजुमने पोलिसांसमोर अखेर गुन्हा कबूल केला.
प्रियकर अमीरने दुसऱ्या मुलीशी प्रेमसबंध निर्माण केल्याने आलेल्या रागातून आपण हा हल्ला केल्याची कबुली अंजुमने दिली आहे. क्राईम पेट्रोल सिरीजमधून प्रेरित होऊन हा हल्ला केल्याचे तिने सांगितले.