अहमदनगर : शिर्डीजवळील निमगाव येथे असलेल्या साई पालखी निवारामधील हॉटेलच्या लिफ्टची वायर तुटल्याने मोठा अपघात झाला. ही लिफ्ट अचानक चौथ्या मजल्यावरून खाली आदळत, पुन्हा चौथ्या मजल्यावर जाऊन धडकली. यात मुंबईच्या विरार येथील चार साई भक्त महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना उपचारांसाठी साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असा झाला अपघात..
मकरसंक्रांतीनिमित्त मुंबईतील विरार येथून साईबाबांच्या दर्शनासाठी म्हात्रे परिवार शिर्डीला आले होते. त्यांनी शिर्डीजवळील निमगाव येथील साई पालखी निवारातील हॉटेलमध्ये रुम घेतली होती. सायंकाळी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आल्यानंतर स्वाती म्हात्रे, वैशाली म्हात्रे, हेमलता म्हात्रे, दिपाजली म्हात्रे आणि यांचा बरोबर तीन लहान मुले रात्री नऊच्या सुमारास बाहेर पडली होती. चौथ्या मजल्यावरुन लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्ट थेट खाली येऊन आदळली, आणि पुन्हा चौथ्या मजल्यावर जाऊन अडकली.
जखमींना रुग्णालयात केले दाखल..
यावेळी महिलांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या कुटुंबियांपैकी अमित आणि काही लोकांनी लिफ्टच्या दरवाजाची जाळी तोडून या सर्वाना बाहेर काढले. तसेच त्यांना तातडीने यांना साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात चारही महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हॉटेल प्रशासनाने कोणतीही मदत न केल्याचा आरोप..
विरार येथील काही लोकांचे शिर्डीत पालखी निवारा हॉटेल असल्याने आम्ही नेहमी इथेच थांबतो. मात्र, आज आमच्या बरोबर एवढी मोठी घटना घडल्यानंतरही हॉटेलमधील कर्मचारी व हॉटेल मॅनेजर यांनी कुठलीही मदत आम्हाला केली नसल्याचा आरोप यावेळी अमित म्हात्रे यांनी केला आहे.