अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील वाळूची ट्रक पकडल्यानंतर त्याच्यावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तीन पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वसंत कान्हू फुलमाळी (शंकर नगर, पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण (पोलीस वसाहत, शेवगाव) आणि कैलास नारायण पवार (शंकर नगर, पाथर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकात नियुक्त आहेत.
तीनही आरोपी फरार
या प्रकरणातील तक्रारदार यांची वाळुची ट्रक उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील पोलिसांनी ७ एप्रिल रोजी पकडले होता. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून पैशाची मागणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान तीनही आरोपींनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोड करत 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हे तीनही आरोपी सध्या फरार झाले आहेत त्यांचा शोध घेण्यात येत आहे. लाचलुचपत विरोधी विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, निलेश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.